Trekking
Harihar Fort
हरिहर किल्ला : एक अनोखे सह्यशिल्प
सह्याद्रीच्या डोंगररांगा नेहमीच शत्रू पासून आपल्या भूमीचे रक्षण करत आलेल्या आहेत. सह्याद्रीच्या नैसर्गिक दुर्गमतेच अचूक वापर करून गड किल्ल्यांची निर्मिती आपल्या पूर्वजांनी केलेली आहे. हे गड कोट निर्माण करताना वास्तुकलेचा अप्रतिम वापर करण्यात आलेला आहे. शत्रूला सहजासहजी जिंकता येणे तर सोडाच पण साध या गड किल्ल्यांवर पोहोचणे सुद्धा अत्यंत अवघड होते. या साठीच गड किल्ल्यांची रचना करताना सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलेले दिसून येते. गड दुर्गम राखण्यासाठी गडावर पोहोचण्याच्या वाट नेहमीच अवघड ठेवण्यात आल्या आहेत. अश्याच अनवट अवघड मार्ग असलेल्या किल्ल्यांपैकी एक दुर्गम सह्य शिल्प म्हणजे किल्ले हरिहर.. नाशिक जिल्यातील त्र्यंबक रांगेतील एक बेलाग किल्ला.. हा किल्ला आपल्या वैशिष्टपूर्ण कातळ पायऱ्यासाठी ओळखला जातो..हरिहर किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला निरगुडपाडा किंवा हर्षवाडी या गावात पोहोचावे लागते..दोनही गावातून किल्ल्याकडे जाणारा रस्ता आपल्याला हरिहरच्या पायथ्यापर्यंत घेऊन जातो. पैकी हर्षवाडी कडून पायथ्यापर्यंत पोहोचण्यास कमी वेळ लागतो..पण जंगल वाटेने भटकंतीचा अनुभव घ्यायचा असेल तर निरगुडपाडा गावातूनच जाणे उत्तम. हे गाव सर्व बाजूनी डोंगरांनी वेढलेले आहे. छोटेसे परंतु टुमदार.. गावाच्या पूर्वेकडून चालत जाऊन डाव्या वाजूस वळले कि समोरच हरिहर चे मनोरम दर्शन होते. दुरून हा किल्ला पहिला तर सरळ उभ्या कातळ भिंतीमुळे वर जायचं कस हा प्रश्न पडतो.
Copyright @Ravindra Chobhe |
गावात चौकशी केली कि दुरूनच वाट दाखवतात..त्या दिशेने चालायला सुरवात करावी..सुरुवातीला भात खाचराच्या बांधावरून चालावे लागते.. थोड पुढ गेल कि चढण सुरु होते.. चालताना सहज डावीकडे पाहिलं कि एक वैशिष्ट्यपूर्ण डोंगर आपले लक्ष वेधून घेतो.. शंकूच्या आकाराचे शिखर आणि माथ्यावर एखाद्या मानवी चेहऱ्याच्या आकाराचा सुळका..दुरून छोटा भासतो.. त्यावर चढण अशक्य वाटत पण दुर्बिणीतून पाहिलं तर त्यावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता..
चालताना मुख्य वाट सोडायची नाही, नाहीतर एखादी छोटी पायवाट आपल्याला भलतीकडेच घेऊन जाते..साधारण तासाभराची वाटचाल केली कि आपण पठार सदृश्य भागात पोहोचतो. इथून सरळ उजवीकडे चालत जायचं. आता प्रथमच हरिहरच्या कातळ पायऱ्या दिसू लागतात. इथे आपल्याला टपरीवजा हॉटेल लागेल. तिथ थंडगार लिंबू शरबत, पाणी बॉटल, बिस्किटं इत्यादी पदार्थ मिळतात. आत्तापर्यंत चांगलीच दमणूक झाल्याने शरबत अमृततुल्य लागत..
आता अर्ध्या तासाची वाटचाल करून हरिहरच्या पायथ्याला पोहोचतो.. इथून सरळसोट कातळ पायऱ्या पाहताना चांगलीच धडधड वाढते..पायऱ्या संपतात तिथे प्रवेशद्वार दिसते. तिथून पुढचा रस्ता मात्र दिसत नाही.
आता फार विचार न करता पायऱ्या चढायला सुरुवात करावी..कातळात खोदलेल्या पायऱ्या कमी जास्त उंचीच्या आहेत. तीव्र चढण आहे. जवळजवळ ऐंशी अंशातील कोण..तेंव्हा ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांनी खाली न पाहता सरळ चढाई सुरु ठेवावी. समाधानाची बाब एवढीच कि या पायऱ्याच्या दोन्ही बाजूना खाचा तयार केल्या आहेत. त्यात घट्ट पकड बसते. त्यामुळ खाली पडण्याची भीती कमी होते..
अंदाजे दोनशे फुटाची खडी चढाई करून आपण पावेश्द्वारात पोहोचतो. प्रवेशद्वार छोटेसेच आहे. इथून कड्याच्या डाव्या बाजूने कोरलेला बाल्कनी सारखा मार्ग आहे. इथून फार जपून चालावे कारण सरळसोट काही हजार फुटाचा कडा आहे.
पुढे परत कातळात खोदलेला मार्ग लागतो.. सुरुवातीला जपूनच चालावे.. इथल्या पायऱ्या अरुंद तर आहेतच पण खाली खोल दरी आहे.. चांगलीच धडकी भरते.. इथून पुढे गेले कि परत एक बोगदा वजा प्रवेशद्वार लागते त्यातून वर चढले कि आपण किल्ल्यावर पोहोचतो.. वर पोहोचल कि हायसं वाटत.. ज्यांच्या मनात उंचीची भीती आहे त्यांना मात्र आता कस उतरायचं हा प्रश्न सातवतोच.. कारण चढणे एक वेळ सोपे पण उतरणे महा कठीण आहे..
सुरुवातीलाच गणेशाची मूर्ति दिसते. सुरक्षित वर येत आले म्हणून गणेशाला वंदन करून थोडा वर चढाव.. उजवीकडे भगवा झेंडा फडकत असतो.. इथून खालच विहंगम दृश्य दिसते..
आता वाटचाल करायची ती शिखराकडे.. पंधरा मिनिट सोपी चढण केली कि आपण शिखर माथ्याच्या खाली पोहोचतो. साधारण वीस फुटाचे सोपे कातळारोहन करून आपण माथ्यावर पोहोचतो.. इथे एका वेळी वीस पंचवीस जणच थांबू शकतात.. इथून सभोवतालचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. इथे बसून शांतपणे विहंगम नजरा डोळ्यात साठवून घ्यावा.. वितरणा तलावाचा जलाशय, कावनई- त्रिंगलवाडी किल्ला अशी सरस दृश्य दिल्याचे पारणे फेडतात.
आता उजव्या बाजूने खाली उतरून समोर दिसणाऱ्या कोठाराकडे चालत जावे. सुरुवातीला पाण्याचे सहा टाके दिसतील .. त्यातल्या काही टाक्यातील पाणी पिण्यास उत्तम.. आपली तहान भागवून पुढे सुस्थितीतील वास्तू पहावी. गडावरील एकमात्र सुस्थितीतील वास्तू. समोरच ब्रह्मा डोंगर.
परत मागे वळून तलावाच्या दिशेने चालत जावे. तलावातील पाणी पिण्यास योग्य नाही. तलावाच्या काठावर हनुमानाचे छोटे मंदिर आहे तर एका चौथर्यावर शिवलिंग आणि नंदी आहे. परिसर सुंदर आहे.
संपूर्ण गड फिरून पाहण्यास दीड तास पुरतो.. सोबत आणलेली शिदोरी सोडून क्षुधा भागवली कि आपण खाली उतरायला मोकळे. उतरताना दुप्पट काळजी घ्यावी. तीव्र उतार आणि खाली खोल दरी असल्याने काळजी घ्यावी.. विशेषता फोटो काढण्याचा खूप मोह होतो पण उगीच संकटाला आमंत्रण नको. सेल्फी चा तर नाद करू नये. काही ठिकाणी तर एका वेळी एकाच व्यक्तीला चढता किंवा उतरता येते..सकाळी लवकर चढाई केली तर फारशी गर्दी नसते.
निरगुडपाडा येथे पोहोचण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर रोडने जाता येते. इगतपुरी वरूनही जाता येते. गावात मुक्कामाची आणि जेवणाची सोय होते.
एक मुक्काम केला तर जवळच असलेला भास्करगड ट्रेक हि करता येतो.
Trekyatri... Born To Explore
- रविंद्र चोभे
MURPHYY
MURPHYY
MURPHYY
MURPHYY
MURPHYY
MURPHYY





