अध्यक्षीय मनोगत…
४३ वे राष्ट्रीय अधिवेशन,
मराठी पत्रकार परिषद, मुंबई.
……..
सप्रेम नमस्कार,
मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर अतिथी, परिषदेचे विश्वस्त मंडळ, सर्व पदाधिकारी तसेच राज्यातून या अधिवेशनासाठी उपस्थित असलेले जिल्हा व तालुका पत्रकार संघांचे पदाधिकारी आणि पत्रकार बंधू-भगिनींचे मन:पुर्वक स्वागत...
राज्यभरातील पत्रकारांचे नेतृत्व खंबीरपणे पेलणारे परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख सर, विश्वस्त किरणजी नाईक तसेच विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ व पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी अत्यंत सक्षमपणे केले, त्याबद्दल मी प्रथमच सर्वांचे कौतुक करतो.
मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने अध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांशी संवाद साधताना मनस्वी आनंद होत आहे. सर्वप्रथम मराठी पत्रकार परिषदेच्या ऐतिहासिक वाटचालीचे नेतृत्व करणारे परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख, विश्वस्त किरणजी नाईक यांच्या नेतृत्वाखालील विश्वस्त मंडळ तसेच राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसह आपणा सर्वांनी माझ्यावर विश्वास दर्शवून अध्यक्षपदाची धुरा सोपवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो.
परिषदेच्या अध्यक्षपदाची परंपरा
मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी आजवर थोर विचारवंत साहित्यिक काकासाहेब लिमये, पा.वा.गाडगीळ, प्र.के.अत्रे, प्रभाकर पाध्ये, ह.रा.महाजनी, अनंत भालेराव, बाबुराव ठाकूर, द.श.पोतणीस, वसंत काणे, रंगाण्णा वैद्य असे अनेक थोर विचारवंत, विद्वान पत्रकार विराजमान झाले आहेत, आजवरच्या सर्व अध्यक्षांनी त्यांच्या कार्य कर्तृत्वाने परिषदेचाही नावलौकीक वाढवला आहे. त्यांची उंची गाठणे शक्य नसले तरीही परिषदेचा नावलौकीक जपण्यासाठी एक प्रामाणिक शिलेदार या कर्तव्य भावनेतून आपण सर्वांनी सोपवलेली ही जबाबदारी मी विनम्रपणे स्विकारीत आहे. माझ्या कार्यकाळात परिषदेचा कारभार पत्रकार हिताच्या दृष्टीने अधिक प्रगत व पारदर्शक होईल, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन.
पत्रकारांची हित जपणारी संघटना
मित्रांनो, मराठी पत्रकारितेत ८३ वर्षांची परंपरा असलेली आपली मराठी पत्रकार परिषद ही राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था आणि पत्रकारांची हित जपणारी प्रमुख संघटना आहे. राज्यभरात ३५ जिल्हे, तसेच राज्याबाहेरही गोवा, बेळगावसह अनेक ठिकाणचे पत्रकार आपल्या परिषदेशी जोडलेले आहेत. संघटनेचे सुमारे दहा हजारांवर सदस्य आहेत. परिषदेने पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्षाची भुमिका घेतल्यामुळेच पत्रकार संरक्षण कायदा, पेन्शन योजना यासारख्या पत्रकारांच्या अनेक मागण्या मार्गी लागु शकल्या.
पत्रकार हितासाठी सातत्याने लढणाऱ्या या संघटनेचा संघर्षमय इतिहास आपले नेते आदरनिय देशमुख सर यांनी वेळोवेळी आपल्या भाषणांमधुन तसेच ‘संघर्षाची पंच्याहत्तरी’ या आपल्या पुस्तकांमधून तपशीलवार मांडला आहे. त्यामुळे त्याची सविस्तर पुनरावृत्ती करण्याची गरज वाटत नाही. मात्र बदलत्या काळात यापुढेही पत्रकारांसमोर अनेक आव्हाने असणारच आहेत, त्याची सोडवणूक करण्यासाठी कणखर पत्रकार संघटनाच आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेवून यापुढच्या वाटचालीतही परिषद परिवाराचा एक जबाबदार घटक या नात्याने परिषदेचे आपले हे कुटुंब एकजुटीने अधिक समृद्ध करण्याच्या कर्तव्यपुर्तीची जाणीव प्रत्येकाने आपल्या मनात अधोरेखित करण्याची गरज आहे.
माझ्या पत्रकार बांधवांना निर्भिडपणे काम करता यावे, याकरीता पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामीण भागात प्रबोधन करणाऱ्या छोटया वृत्तपत्राबाबतचे शासनाचे जाचक धोरण, ज्येष्ठ व पात्र पत्रकारांना पेन्शन, पत्रकारांच्या आरोग्याची आणि कुटुंबाची काळजी घेणारे विमा संरक्षण, अधिस्विकृती व पेन्शनचे कठोर निकष, तसेच जिल्हा पत्रकार भवने यासह विविध बाबींसाठी आपल्या सर्वांच्या पाठबळावर शासनाकडे पाठपुरावा लागणार आहे. त्यासाठी परिषदेला यापुढील काळात एक अधिक प्रभावी दबावगट म्हणून काम करताना संघर्षाची तयारी ठेवावी लागेल.
काळानुसार आधुनिक बदलांचे आव्हान
काळानुरुप माध्यमांचे स्वरुपही बदलत आहे. माध्यम जगतात प्रिंट, रेडिओ, टीव्हीसह डिजिटल, पॉडकास्टसह अनेक बदल आपण पाहात आहोत. आधुनिक काळातील या बदलांना सामोरे जाण्यासाठी स्वत:ला सतत अपडेट करण्याचे आव्हानही आपल्या पत्रकार सहकाऱ्यांना पेलावे लागणार आहे.
सध्या वर्तमानपत्रात बातम्या वाचण्याच्या तुलनेत सोशल मीडिया, टीव्ही, ऑनलाईन न्युज पोर्टल अथवा युट्युब सारख्या डिजिटल माध्यमातून बातम्या पाहणे किंवा ऐकण्याचे प्रमाण वाढतेय. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून टीव्ही चॅनेल्ससह युट्युब, पोर्टलसारख्या डिजिटल माध्यमांची संख्याही वेगाने वाढत आहे. न्युजब्रेकींगची स्पर्धा आता शहरापासून गावापर्यंत पोहोचली असून सुलभ तंत्रामुळे ग्रामीण व शहरी भागातही अनेक न्युजपोर्टल तसेच युट्यूब चॅनेल्स सुरू झाली आहेत. त्यासाठी दर्जेदार व विश्वासार्ह कंटेंट तयार करणे तसेच तो कंटेंट वाचकांपर्यंत वेळेत पाेहोचवण्यासाठी आधुनिक काळाच्या तंत्रसाधनांचा वापरही करता आला पाहीजे. तरच आपले माध्यमांमधील व समाजामधील महत्व टिकून राहील.
‘डिजिटल मीडिया परिषद’
वेबपोर्टल्सची संख्या वेगाने वाढत असली तरीही त्यांना वर्तमानपत्र किंवा वाहीन्यांप्रमाणे मान्यता तसेच त्यांचं शासकीय जाहिरातीसह ‘रेव्हेन्यू मॉडेल’ मात्र तयार होऊ शकलेलं नाही. यादृष्टीने आपल्या पत्रकार बांधवांना सर्वतोपरी अधिक सक्षम करण्यासाठी परिषदेने ‘डिजिटल मीडिया परिषद’ हा स्वतंत्र विभागही सुरु केला आहे. या नव्या माध्यमात काम करणारे राज्यभरातील अनेक सहकारी डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून परिषदेशी जोडले जात असून अनेक जिल्ह्यात डिजिटल मीडिया परिषदेच्या शाखांचा शुभारंभही झाला आहे. या सर्व सहकाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, नोंदणी, आचारसंहिता याबाबत मार्गदर्शन व पाठबळ देवून अधिक समृद्ध व सक्षम करण्याचा परिषदेचा प्रयत्न आहे.
परिषदेचे संघटन अधिक मजबुत व्हावे, यादृष्टीने राज्यभरात तालुका तसेच जिल्हा संघांनी नवी सदस्य नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी नवी सदस्य नोंदणी होताना दिसत नाही. त्यासाठी परिषदेने एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले असून या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे परिषदेचे उपक्रम, नवी सदस्य नोंदणी, नियुक्तीपत्र व ओळखपत्र देणे यासह विविध सेवा तसेच आपले सहकारी व पदाधिकाऱ्यांची माहिती एका क्लिकवर देणे शक्य होणार आहे. तसेच परिषदेच्या ‘तालुका जोडो’ अभियानालाही चालना मिळणार आहे.
परिषदेला सहकार्याची अपेक्षा
कोणतीही संघटना सदस्यांना पाठबळ देत असतानाच संघटनात्मक कामासाठी सदस्यांकडूनही वेळ, अर्थ, ज्ञान, श्रम अशा योगदानासह सक्रिय सहभाग मिळाल्यास अधिक सक्षम होते. परिषदेलाही अधिक सक्षम करण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. नवीन नवी सदस्य नोंदणीसह कालावधीनुसार आवश्यक तेथे निवडणूका घेवून संघटनेला पाठबळ देणारे सक्षम पदाधिकारी निवडणे, विविध उपक्रम राबवणे, पत्रकारांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करणे, तसेच दरवर्षी संघाचा कार्यअहवाल परिषदेकडे पाठवणे गरजेचे आहे. जेणेकरुन तालुका तसेच जिल्हा संघांच्या उत्कृष्ट कामगिरीचे परिषदेकडून पारितोषिकांच्या माध्यमातून कौतुक करुन त्यांना पाठबळही देता येईल. या प्रभावी कामकाजासाठी परिषदेचे मुंबई कार्यालय अजून अद्ययावत व साधनसामग्रीने प्रगत करण्याचा परिषदेचा मानस आहे, त्यासाठी साहजिकच अधिक आर्थिक भार पडणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक संघाने आपली संलग्नता वर्गणी तसेच यथाशक्ती देणगी स्वरूपात परिषदेला सहकार्यही केले तर आपल्या पत्रकार बांधवांसाठी परिषदेला अधिक सक्षमपणे काम करणे शक्य होईल.
कोरोना काळातील कटू आठवणी
कोरोना काळातील अनेक कटू आठवणी अजुनही डोळ्यांसमोरुन जात नाहीत. या काळात मदतीची खरी गरज ओळखून परिषदेच्या जिल्हा व तालुका संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही पत्रकारांना विविध प्रकारे मदतीचा हात दिला. काेरोनाच्या विळख्यात आपण आपले अनेक सहकारी गमावले, त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहताना त्यांच्या कुटूंबांना पाठबळ देण्याबराेबरच या कठोर काळात समाजासाठी धाडसाने काम करणाऱ्या परिषदेच्या शिलेदारांच्या कामाचे कौतुकही परिषदेचे नेते मा.एस.एम.देशमुख सर यांनी केले. तसेच अशा कठोर काळात समाजासाठी काम करणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी समाजानेही खंबीरपणे उभे रहावे आणि शासनानेही आराेग्यसुविधांसह पत्रकारांना पाठबळ द्यावे, यासाठीही परिषदेच्या वतीने आग्रहही धरला आहे.
बाळशास्त्री जांभेकर स्मारक
सिंधुदुर्ग जिल्हयाचे सुपुत्र असलेले आद्यपत्रकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व्हावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने एक तपाहून अधिक काळ संघर्ष केला आणि अखेर सुमारे पावणे पाच कोटींचे भव्य दिव्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक, पत्रकार भवन सिंधुदुर्गात उभारले जात आहे. मराठी पत्रकारांच्या अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या या स्मारकासाठी पुढाकार घेणारे परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांचेही मी आभार व्यक्त करतो.
मित्रांनो, दर दोन वर्षांनी परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन होते. परंतू कोरोना काळात अनेक निर्बंधांमुळे अधिवेशन होवू शकले नाही. मात्र आता पिंपरी-चिंचवडच्या या पवित्र भूमित मराठी पत्रकार परिषदेचे हे ४३ वे अधिवेशन संपन्न होत आहे. त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी - चिंचवड पत्रकार संघ तसेच त्यांना साथ देणाऱ्या पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वसुविधांसह केलेली जय्यत तयारी तसेच सर्वांच्या स्वागत व आदरातिथ्याचा मनस्वी आनंद वाटत आहे.
पत्रकारांचे प्रश्न सुटण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित..
द्वैवार्षिक अधिवेशनात बदलत्या माध्यमांसह विविध विषयांवर वैचारीक मंथन तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत सरकारमधील विविध नेते लोकप्रतिनीधी, ज्येष्ठ विचावंत पत्रकार आदींच्या उपस्थितीत चर्चा होवून ते सुटण्यासही मदत होते. या अधिवेशनातील वैचारीक मंथनासह पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबतच्या चर्चांमधून पत्रकारांचे प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होईल, अशी अपेक्षा आहे. परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांचे सर्व प्रश्न सुटण्यासाठी सर्वांचे एकजुटीने सहकार्यही लाभावे, अशीही सदीच्छा व्यक्त करतो.
तसेच परिषदेच्या या द्वैवार्षिक अधिवेशनाच्या आयोजनाचे शिवधनुष्य समर्थपणे पेलणाऱ्या पिंपरी - चिंचवड पत्रकार संघ तसेच त्यांना साथ देणाऱ्या पुणे जिल्हा पत्रकार संघासह सर्व पदाधिकाऱ्यांनाही खुप खुप धन्यवाद देतो. तर आपणा सर्वांचेही आभार मानून माझे अध्यक्षीय मनोगत संपवतो.
जय हिंद, जय परिषद !
-------------
शरद पाबळे,
अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद, मुंबई.

मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास
जाणुन घेऊ या ८३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास : एस एम देशमुख
……..
मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची सर्वात जुनी, सर्वात मोठी, सर्वसमावेशक अशी एकमेव संघटना आहे. राज्यातील ३६ जिल्हे आणि जवळपास सर्वच म्हणजे ३५८ तालुक्यात परिषदेचा शाखा विस्तार झालाय. दिल्ली, पणजी, हैदराबाद, विजापूर, बेळगाव, निपाणी सह अन्य काही राज्यातील शहरातही परिषदेच्या शाखा कार्यरत आहेत. देशभरातील ९ हजारांवर मराठी पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत.. सर्वच सदस्यांचं परिषदेवर निस्सीम प्रेम आहे. म्हणूनच राज्यातील पत्रकार परिषदेला आपली मातृसंस्था मानतात.
३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईत स्थापन झालेल्या परिषदेचा इतिहास रोमहर्षक आणि पत्रकारांच्या नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. पत्रकारितेत ज्यांनी उल्लेखनिय कार्य केलेलं आहे असे अनेक मान्यवर आणि नामंवत संपादक, पत्रकार मराठी पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले होते.मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापनेतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यातील अनेक जण मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षही होते. मराठी पत्रकार परिषदेच्या प्रत्येक सदस्यांसाठी ही बाब अभिमानास्पद आहे.
महाराष्ट्रात मराठी पत्रकारांची आर्थिक, बौध्दिक आणि वैचारिक उन्नती व्हावी यासाठी एखादी संघटना असावी असा एक विचार स्वातंत्र्याच्या बराच अगोदर तत्कालिन पत्रकारांच्या समोर आला.त्याला मूर्त स्वरूप देता यावं यासाठी १९३३ मध्ये पुण्यात संपादकांचं एक संमेलन भरविण्यात आलं होतं. त्यासाठी गोपाळराव ओगले यांनी पुढाकार घेतला होता. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देखील तेच होते. संमेलनाचा त्यावेळी मोठा गाजावाजा झाला मौजनं तर खास विशेषांकही काढला. तात्यासाहेब केळकर यांच्यासारख्या ज्येष्ठांचा संमेलनात सहभाग होता. तथापि ज्या उद्देशानं हे संमेलन भरविण्यात आलं होतं तो उद्दश काही सफल झाला नाही. पत्रकार संघटना स्थापनेच्यादृष्टीन काहीही निर्णय होऊ शकला नाही. याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे, ओगले यांच्या भाषणात संयुक्त 'महाराष्ट्राच्या कल्पनेचं बिजारोपण केलेलं होतं. मुख्य मुद्दा सोडून उपस्थित झालेला हा विषय अनेकांना आवडला नाही. त्यामुळे मंडळी जमली,वेगवेगळ्या विषयावर चर्चा करून निघून गेली. त्याकाळी मुंबईत पत्रकारांची अशी मासिक संमेलन भरत. पुण्यातल्या या संमेलनाला मुंबईतील पत्रकारांच्या मासिक संमेलनासारखंच स्वरूप आलं होतं.त्यामुळं या संमेलनाची चर्चा झाली पण विषय चर्चेवरच थांबला. कालांतराने विषय लोकांच्या विस्मृतीतही गेला. पाच-सहा वर्षे मग काहीच झालं नाही. ती वर्षे अशीच गेली. नंतरच्या काळात वृत्तपत्र व्यवसाय आर्थिक संकटात सापडल्याने अडचणीत आला होता. कमालीचं अस्थैर्य आलं. पत्रकारांना मानसन्मानानं जगणं, केवळ कठिणच झालं असं नाही तर ते दुरापास्तही झालं. दुसरीकडं अभ्यासू, हाडाच्या पत्रकारांचीही उणिव भासायला लागली. निस्पृह भावनेनं पत्रकारितेला वाहून घेणारे पत्रकार दुर्मिळ झाले होते. (म्हणजे पत्रकारितेत निस्पृहपणे, एक सेवा किंवा व्रत समजून काम करणाऱ्या पत्रकारांची 'टंचाई' केवळ आजच भासते आहे असं नाही तर ८२ वर्षांपूर्वी देखील हीच परिस्थिती होती, ध्येयवादी मंडळींची पत्रकारितेला तेव्हाही गरज होती. आजही आहे.) माध्यमांसमोरील या अडचणी आणि इंग्रज सरकारकडून वेगवेगळे कायदे करून माध्यमांची होणारी मुस्कटदाबी यामुळं सारी वृत्तपत्रसृष्टीच त्रस्त झाली होती. वृत्तपत्र व्यवसायावर सातत्यानं व्यवस्थेकडून होणारा अन्याय आणि आर्थिक अस्थैर्यामुळं आलेलं नैराश्य दूर करून परत एकदा वृत्तपत्र व्यवसायाला नवी उभारी देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं, संघटीत प्रयत्न करणं गरजेचं होतं. तशी गरजही पुन्हा एकदा सर्वांनाच जाणवायला लागली होती. त्या अंगाने प्रयत्नांनीही मग वेग घेतला. १९३९च्या सप्टेंबरमध्ये भा.वि. वरेरकर, लालजी पेंडसे, अनंत काणेकर, गो. बा. महाशब्दे यांच्यासारखे काही मान्यवर, 'मराठी पुरोगामी लेखक संघा'च्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आले होते. बैठकीत या सर्वांनी लेखक संघाप्रमाणं संपादक, उपसंपादकांचे एक संमेलन बोलावून ठोस अशी काही तरी योजना अंमलात आणावी असा निर्णय घेतला. ही सारी मंडळी मग केवळ चर्चा करूनच थांबली नाही तर संपादक, उपसंपादक आणि बातमीदारांची एक बैठक २५ ऑक्टोबर १९३९ रोजी मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये बोलावण्यात आली. भा. वि. वरेरकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस १९ नियतकालिकांचे संपादक, उपसंपादक उपस्थित होते. बैठकीत पत्रकारिते समोरील विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा झाली. पत्रकारांच्या स्थितीवरही अनेकांनी मतं व्यक्त केली. ही सारी परिस्थिती बदलायची असेल तर सामुहिक प्रयत्नांची गरज आहे आणि त्यासाठी एखादं प्रभावी व्यासपीठ असलं पाहिजे यावर उपस्थितांचं एकमत झालं. पत्रकारांची ही संघटना महाराष्ट्रव्यापी असावी असंही बैठकीत ठरलं.मराठी पत्रकार परिषदेची मुहूर्तमेढ इथंच रोवली गेली. संघटना स्थापन करताना पत्रकारांचं महाराष्ट्र पातळीवरचं एक अधिवेशन किंवा परिषद भरविली जावी अशी सूचना के.रा.पुरोहित यांनी मांडली. ती स्वीकारण्यात आली. संघटना स्थापन करण्याचं ठरलं पण संघटनेचं नाव काय असावं यावर बैठकीत तब्बल दोन तास काथ्याकूट झाला. अंतिमतः अनंत काणेकर यांनी संस्थेचं नाव मराठी पत्रकार परिषद असावं असं सूचवलं. त्यावर उपस्थितीतांची मत आजमाविली गेली. सर्वांना हे नाव मान्य होतं. आता वेळ घालविण्याची कोणाचीच तयारी नव्हती. ३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईतील 'विल्सन हायस्कूल'च्या प्रांगणात 'मुंबई मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आलं होतं. तत्कालिन पत्रकारांमध्ये अनेकजण ज्येष्ठ साहित्यिक असल्यानं साहित्य संमेलनातच मराठी पत्रकार परिषद स्थापन करण्याचा ठराव संमत झाल्यानंतर परिषदेच्या पहिल्या कार्यकारिणीची निवडही याच संमेलनात गुप्त मतदान पध्दतीनं केली गेली. बारा उमेदवार होते. त्यापैकी वा. रा. ढवळे, र. धो. कर्वे, के.रा. पुरोहित, य. कृ. खाडीलकर, वरेरकर, का.म. ताम्हणकर, आप्पा पेंडसे यांची कार्यकारिणीवर निवड केली गेली. कार्यकारी मंडळ अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत सुंदर मानकर, द. पु. भागवत, आणि पालेकर यांना स्वीकृत सदस्य म्हणून कार्यकारी घेण्यात आलं. परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्यकारी मंडळान ज्ञानप्रकाश काकासाहेब लिमये यांची एकमतान निवड केली . तेच मराठी पत्रकार परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. कार्याध्यक्ष म्हणून भा.वि. वरेरकर यांची निवड केली गेली. स्वागताध्यक्ष नवाकाळचे संपादक य.कृ.खाडीलकर झाले. के.रा.पुरोहित हे मराठी परिषदेचे पहिले सरचिटणीस झाले. याच वेळी संघटनेच काम वाढविण्यासाठी आणि पुण्यात मराठी पत्रकार परिषदेच्या शाखा स्थापन करण्याचा आणि पुरोहितांनी पुण्यात पेंडसे यांनी मुंबईत परिषदेला अधिकाधिक पत्रकारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करावा असे ठरले. तशी जबाबदारी त्या दोघांवर सोपविली गेली. मुंबईसाठी मुंबई पत्रकार परिषद स्थापन करावी असा ठराव पुरोहितांनी मांडला. या ठरावासह काळे आणि मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य अत्रे यांनी पाठिंबा देत हा ठराव संमत केला गेला.मराठी पत्रकार परिषदेच्या या अधिवेशनास ६९ नियतकालिकांचे प्रतिनिधी मिळून ११० पत्रकार उपस्थित होते. यावेळी इतरही काही ठराव संमत झाले. अशा प्रकारे ३ डिसेंबर १९३९ रोजी मराठी पत्रकार परिषदेची अधिकृतरित्या स्थापना झाली.
काकासाहेब लिमये यांनी१९३९ पासून पुढील अधिवेशनापर्यत एका कार्यकारी मंडळाची निवड केली. मराठी पत्रकार परिषदेच्या या मध्यवर्ती मंडळात अध्यक्ष कृ.ग. लिमये, उपाध्यक्ष शं.बा. किर्लोस्कर व त्र्यं.र.देवगिरीकर यांच्यासह एकूण सोळा सभासद होते.पुरोहित आणि रा.गो. कानडे हे सरचिटणीस होते. मुंबई शाखेचे पहिले अध्यक्ष म्हणून अनंत काणेकर यांची निवड केली गेली होती. चिटणीस द.पु. भागवत होते अन्य नऊ सभासद होते. दा.वि. गोखले हे पुणे शाखेचे पहिले अध्यक्ष होते. दि.वा. दिवेकर चिटणीस होते.तसेच अन्य दहा सदस्य कार्यकारिणीत होते.
मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली. पुणे आणि मुंबईतील शाखांचे काम जोरात सुरू झालं. राज्यातील पत्रकारही मराठी पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र आले.मराठी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मराठी पत्रकार प्रथमच एकत्र आले होते. पत्रकार संघटीत झाल्यामुळे सरकारच्या प्रांतिक वृत्तपत्र सल्लागार समितीवर परिषदेचा एक प्रतिनिधी घेतला जावा अशी मागणी केली गेली.. ती सरकारला मान्य करावी लागली य. कृ. खाडीलकर यांची पहिले प्रतिनिधी म्हणून समितीवर नेमणूक केली गेली.मराठी पत्रकार परिषदेच्या काही बैठका पुण्यात तर काही मुंबईत घेतल्या गेल्या. त्यात पत्रकार सल्लागार समितीवर मराठीचा आणखी एक प्रतिनिधी असला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. ती ही मान्य केली गेली. समितीवर कोणाला पाठवायचे यासाठी निवडणूक घेतली गेली. त्यात काकासाहेब लिमये यांना पुण्यातर्फे पाठविण्याचं ठरलं.
मराठी पत्रकार परिषदेचे दुसरं अधिवेशन पुण्यात*
मराठी पत्रकार परिषदेचं पहिलं अधिवेशन मुंबईत तर दोन वर्षांनी परिषदेचं दुसरं अधिवेशन १८ मे १९४९ रोजी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात घेण्यात आलं. पहिल्या अधिवेशनाप्रमाणंच अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून न. र. फाटक यांची निवड झाली.. केसरीचे संपादक तात्यासाहेब करंदीकर हे स्वागताध्यक्ष होते. पुण्याच्या अधिवेशनात विविध ठराव संमत झाले. पहिल्या आणि दुसऱ्या अधिवेशनाच्या काळात अनेक घडामोडी घडल्या होत्या, रत्नागिरीत भरलेल्या साहित्य समेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना ना. सी. फडके यांनी पत्रकारिता व्यवसायावर आणि संपादक, उपसंपादकांवर सपाटून टीका केली होती. या संमेलनास मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस पुरोहित तसेच पेडसे उपस्थित होते. अध्यक्षांनी वृत्रपत्रसृष्टीवर केलेली टीका या दोघांना मान्य होणं शक्य नव्हतं. या दोघांनी तसेच संमेलनास उपस्थित असलेल्या अन्य पत्रकारांनी फडके यांच्याकडे जाहीर चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी ती धुडकावून लावल्यानं विषय नियामक सभेत आला. तेथे अध्यक्षांच्या विरोधात निंदाव्यंजक ठराव मांडण्यात आला. तो ठराव संमत झाला नाही हे जरी खरं असलं तरी साहित्य संमेलनाच्या इतिवृत्तांत त्याची नोंद घ्यावी लागली. एवढं सारं रामायण घडल्यानंतर समारोपाच्या कार्यक्रमात फडके काहीसे नरमले आणि आपली तक्रार सर्वच पत्रकारांबद्दल नसून काहींबद्दल आहे' अशी आजच्या नेत्याला शोभेल अशी टिप्पणी त्यांनी केली. काही म्हणजे नेमक्या कोणत्या पत्रकाराबद्दल यावर मात्र ते काही बोलले नाहीत किंवा कोणत्या वर्तमानपत्राचं नावही ते घेऊ शकले नाहीत. या घटनेचे पडसाद मराठी पत्रकार परिषदेच्या पुण्यातील अधिवेशनात उमटणे स्वाभाविक होते. त्यावर जोरदार चर्चा झाली. पुरोहित आणि पेंडसे यांनी फडके याच्या वक्तव्याला रत्नागिरीत जोरदार आक्षेप घेऊन 'कारण नसताना कोणी पत्रकारांना डिवचले तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्याला तीव्र प्रतिकार करू आणि प्रसंगी जश्यास तसे उत्तर देऊ' हे दाखवून दिलं. परिषदेचा हा लढाऊबाणा पुढच्या काळात आणि आजतागायत कायम राहिला. पत्रकारांचे हक्क आणि पत्रकारांच्या स्वाभिमानाच्या लढ्यात मराठी पत्रकार परिषद नेहमीच आक्रमक राहिली हे आपणास दिसते. बिहार प्रेस बिलाचा विषय असो की नंतर राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याचा विषय असो मराठी परिषद नेहमीच मुठी आवळत रस्त्यावर उतरलेली दिसेल. विशेषतः एस. एम. देशमुख २००० मध्ये मराठी परिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर परिषद अधिकच आक्रमक झाली. नंतरच्या काळात अशक्य वाटणारा पत्रकार संरक्षण कायदा झाला. महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव असे राज्य आहे की जेथे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण आहे. या कायद्याचं श्रेय मराठी पत्रकार परिषद आणि एस.एम.देशमुख यांच्या नावावर आहे. या कायद्यासाठी राज्यातील पत्रकारांना बारा वर्षे संघर्ष करावा लागला.मराठी परिषदेच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील पत्रकारांना पेन्शन मिळू लागले. निवृत्त पत्रकारांना ११,००० रूपये पेन्शन मिळते.बाळशास्त्री जांभेकर यांच्या सिंधुदुर्ग येथील स्मारकाचा विषय देखील मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघामुळे मार्गी लागला. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण योजना केवळ परिषदेच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागली. त्याचा शेकडो गरजू पत्रकारांना लाभ मिळाला. मजिठियाचा विषय असो किंवा छोट्या वृत्तपत्रांच्या जाहिरातदराचा विषय असो, मराठी पत्रकार परिषदेने हे विषय हाती घेत निर्धाराने लावून धरले. सोडवले. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी मराठी पत्रकार परिषद नेहमीच जागरूक आणि आक्रमक राहिली आहे.मराठी पत्रकार परिषदेने राज्यात मोठी चळवळ उभी केली असल्याने पत्रकार जसे संघटीत झाले तसेच ते निर्धास्त झाले. मराठी पत्रकार परिषद है ना. हा विश्वास राज्यातील पत्रकारांच्या मनात निर्माण करण्यात मराठी पत्रकार परिषद यशस्वी झाली. मराठी पत्रकार परिषद केवळ पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी संघटना नाही तर मराठी पत्रकार परिषद हे कुटुंब समजून गरजू पत्रकारांना मदतीचा हात पुढे करताना मराठी पत्रकार परिषदेने कधी आखडता हात घेतला नाही. कोरोना काळ असो की, त्याच्या अगोदरचा काळ मराठी पत्रकार परिषद खंबीरपणे पत्रकारांबरोबर राहिली. गेल्या ३ वर्षात परिषदेने जवळपास सत्तर लाख / ७० लाख रूपयांची मदत गरजू पत्रकारांना केली. कोरोना काळात पुण्यात जीवनावश्यक वस्तू सर्वच सदस्यांना देण्यात आल्या. अन्यत्रही कोरोना काळात पत्रकारांना मोठी मदत दिली गेली. त्यामुळे मराठी पत्रकार परिषददेबद्दल विश्वास आणि आपुलकीचे वातावरण राज्यात निर्माण झालेले आहे. आज राज्यात मराठी पत्रकार परिषदच ही अशी एकमेव संघटना आहे की, जी कायम पत्रकारांबरोबर आहे.मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांना आपले कुटुंब समजते.. हे कुटुंब अधिक व्यापक व्हावं यासाठी पुढील काळात अधिक प्रभावी पणे काम करण्याचा मराठी पत्रकार परिषदेचा निर्धार आहे.
…….
एस.एम.देशमुख
मुख्य विश्वस्त,
मराठी पत्रकार परिषद, मुंबई.
